कणेगांव

 

नावाविषयी माहितीः

ऐतिहासिक  – कणेगांव हे वारणानदीच्या पूर्वेकडील काठावर वसलेले एक छोटेसे गांव. गावाला कणेगांव हे नांव पडण्याची अख्यायिका अशी – पूर्वी चांदोली धरण होण्याअगोदर केवळ पावसाळयात नदी तुुडुंब वाहत तर हिवाळा आणि उन्हाळयात नदीचे पात्र कोरडे असायचे.  पावसाळा सोडून इतर ऋतूत लोक पात्रात झा-या लावून पिण्यासाठी पाणी काढत.  या काठावर मका जास्त पिकायचा या मक्याच्या कण्या खाउनच लोक आपला उदरनिर्वाह चालवत.  ÷कण्या' या शब्दावरुन या गावाचे नांव कणेगांव पडले असावे असा एक मत प्रवाह आहे तर दुस-या गावचे ग्रामदैवत ÷कान्होबा' कान्होबाचे नांव नवनाथातील कानिफनाथा वरुन व कन्होबा वरुन कणेगांव पडले असावे असे जुन्या लोकांचे मत आहे.  ग्रामदैवत ÷कान्होबा' हे जागृत देवस्थान असून आजही जर कान दुखत असतील तर भागातील लोक देवाचे दर्शन यायला येतात.

गावापासून नदी केवळ अर्धा किलो मीटर वरुन वाहते.  त्यामुळे दरवर्षी या गावाला पूराचा फटका बसतो.  १९५३ साली आलेल्या महापूराने या गावचे सर्वस्व नेले होते तर गतवर्षी २६ जुलै २००५ च्या महापूराने तर हाहाकार माजविला होता.  मोठया कष्टाने उभा केलेला संसार महापूराने हिरावून नेला, परंतु तरीही इथल्या गावक-यांत निसर्गाशी संघर्ष करण्याची उमेद नसा-नसात ओसंडून वाहत आहे.  कुसुमाग्रजांच्या ÷कणा' कवितेतील तरुणासारखीच जिद्द इथल्या लोकांत आहे. ÷÷ मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन नुसतं लढ म्हणा! ''